सातारा (प्रतिनिधी) : बंड करताना थोडाजरी दगा फटका झाला असता तरी शहीद होण्याचा धोका होता. असे खळबळजनक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या जन्मगावाजवळील तापोळा येथे बोलत होते.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी म्हणजेच सातारा जिल्ह्यातील तापोळा- दरे परिसरात आले होते. तापोळ्यात एकनाथ शिंदेंचे जोरदार स्वागत करण्यात आले. तापोळ्यात येताच त्यांनी सर्वात आधी पद्मावती देवीचे दर्शन घेतले. देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना भेटायला गेलेल्या नागरिकांशी त्यांनी  संवाद साधला. मुंबई माझी कर्मभूमी असली तरी सातारा माझी जन्मभूमी आहे. त्यामुळे आपल्या लोकांनी केलेले स्वागत हे आनंदायीच असते. आमचे सरकार हे शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी हे सरकार आणखी पुढे नेत आहोत. आता जनतेच्या अपेक्षाही वाढलेल्या पहायला मिळत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

येत्या ३ दिवसांत मंत्रिमंडळाला खातेवाटप होईल. आमचे सरकार हे डबल इंजिन सरकार असून आम्ही भविष्यात डबल स्पीडने काम करू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. लोकांचा आणि देवीच्या आशीर्वादाने सगळ काही सुरळीत झाले. मी मुख्यमंत्री झालो त्यामुळे सामान्य माणूस मुख्यमंत्री झाला असल्याचा आनंद सर्वांना झाला आहे. मी गोरगरीबांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवीन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. साताऱ्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. साताऱ्याचा पश्चिम भाग पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. या भागाच्या विकासाच्या विचार सुरू असून लवकरच या बाबतीत आवश्यक ते निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.