कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेची आज (मंगळवार) सर्वसाधारण सभा गोंधळात पार पडली. जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते. काही दिवसापूर्वी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या करण्यात आलेल्या बदल्या आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवरुन सदस्य कल्लाप्पाणा भोगम आणि राहुल आवाडे यांच्यात जोरदार वादावादी झाली.

चंदगड तालुक्यामध्ये काम करायला कर्मचारी तयार होत नाहीत. त्यामुळे अनेक पदे रिक्त आहेत. याचा परिणाम शासकीय कामकाजावर होत असल्याकडे कल्लाप्पाण्णा भोगम यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. चंदगडला न्याय मिळणार नसेल तर गडहिंग्लज जिल्हा स्वतंत्र करून त्यामध्ये चंदगडचा समावेश करावा अशी मागणी  सभागृहात केली. याला मात्र सदस्य राहुल आवाडे यांनी तीव्र विरोध केला. कोल्हापूर जिल्ह्याची फाळणी कोण करणार असेल तर हा प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा आवाडे यांनी दिला.

या वेळी आवडे आणि भोगम यांच्यामध्ये शाब्दिक चकमक पहावयास मिळाली. या वेळी चंदगड तालुक्यात  ज्या प्रकारे कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत त्याचप्रकारे सर्वच तालुक्यांमध्ये तशी अवस्था आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांना समान न्याय देवून कर्मचाऱ्यांचा प्रतिनियुक्त्या रद्द कराव्यात अशी मागणी सर्व सदस्यांनी केली. त्यानंतर आरोग्य विभागातील १७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या साठी मान्यता असताना २० आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. अधिकच्या तीन कर्मचाऱ्यांच्या बदल्या का करण्यात आल्या? असा सवाल करत सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

याला उत्तर देताना मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सर्वच तालुक्यांमध्ये यापुढे कर्मचाऱ्यांची भरलेली पदे आणि रिक्त पदे समान पद्धतीने असतील याची काळजी घेतली जाईल. आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना १२ तालुक्यांना समान न्याय दिला जाईल असे आश्वास सभागृहाला दिले. तसेच आपसी बदल्या करताना कर्मचाऱ्यांना दुर्गम भागात देखील काम करावे लागेल असे सांगितले.

या सभेला उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, विविध समितीचे सभापती, सदस्य यांच्यासह प्रशासन अधिकारी उपस्थित होते.