सातारा (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून काही उपयोग नाही. भाजप नेते देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करा. मराठा समाजाला आरक्षण देण्यास त्यांना मी भाग पाडतो, असे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. तसेच खासदार छत्रपती संभाजीराजे यांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करा आरक्षणाचा प्रश्न एका दिवसात सोडवतो, असेही उदयनराजे म्हणाले. ते साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

उदयनराजे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे आपल्याच वयाचे आहेत. त्यांनी आरक्षण टिकवलं, त्यांना नाव ठेवली जातात. आता सत्तेत आहात ना मराठा आरक्षणाला पुढे न्या. सत्तेत राहायचंय ना, महाराष्ट्र आहे, मराठा समाज निर्णायक जात आहे. जातीतला कोणताही उमेदवार असू देत, त्याच्याकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न तडीला लावणार, असं आश्वासन घ्या, असंही उदयनराजे यांना सांगितलं.

तसेच, शरद पवारांशी चर्चा करुन काही उपयोग नाही. आधीच्या प्रश्नावर त्यांनी उत्तरे द्यावीत. मार्ग निघणार असेल तर चर्चा करावी. सत्र कोर्टातही तारीख देतात. मग सुप्रीम कोर्टानं तारीख दिली नाही. राज्य शासनाचा वकील हजर राहात नाही, असा आरोपही उदयनराजे यांनी यावेळी केला. इतरांना जसे आरक्षण मिळाले तसे मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असं खा. उदयनराजे भोसले म्हणाले.