महादेवराव महाडिक, राजू शेट्टी यांच्यात खलबते

0
1972

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ निवडणुकीसाठी दोन्ही आघाडीकडून जोडण्या लावण्यास वेग आला आहे. मंगळवारी ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक यांनी आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेतली. त्यानंतर आज (बुधवारी) सकाळी त्यांनी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन तासभर चर्चा केली.

राज्यात महाविकास आघाडीकडून डावलल्याची भावना शेट्टी यांच्यामध्ये आहे. त्यातच जिल्ह्याच्या राजकारणातही स्वाभिमानी संघटनेला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दूर ठेवले जात आहे. त्यामुळे शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. याबाबत शेट्टी यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेट्टी यांना आपल्यासोबत घेण्यासाठी महाडिक प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर महाडिक यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

स्वाभिमानीकडून प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी गोकुळसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शेट्टी यांनी आपल्यासोबत येण्याचे साकडे महाडिक यांनी यावेळी घातल्याचे समजते. शेट्टी यांच्या महाविकास आघाडीवरील नाराजीचा फायदा गोकुळ निवड़णुकीत घेण्यात महाडिकांना यश येणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठऱणार आहे. दरम्यान येत्या दोन दिवसांत कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील भूमिका ठरवू, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.