गडहिंग्लज (प्रकाश चोथे) : ब्रिस्क फॅसिलिटीज या व्यावसायिक कंपनीने २०१३ साली करार करून गडहिंग्लज तालुक्याची अर्थवाहिनी असणारा आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना दहा वर्षांसाठी चालवायला घेतला. तेव्हापासून त्यांना हवा तसा चालवलाही..! पण सध्या प्रतिटन ५०० ते ६०० रुपये तोटा सोसून आपण कारखाना सुरू ठेवल्याचे ‘कंपनी’ सांगत आहे. शिवाय करारामध्ये अंतर्भूत नसलेल्या ३४ कोटी ७१ लाख रुपयांचा भुर्दंड सोसत कंपनीने हा कारखाना आणि येथील शेतकरी जगवत असल्याकडेही लक्ष वेधले आहे. पण…

पुणेस्थित असलेल्या या कंपनीला राज्याच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या आणि दुर्गम गणल्या जाणाऱ्या ‘गडहिंग्लज’चा इतका पुळका का यावा, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला विचारात पाडत आहे. ज्या कारखाना मॅनेजमेंटसोबत कंपनीने करार केला त्या मॅनेजमेंटने प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस कंपनीपासून लपवली होती. त्यामुळे नंतर नाइलाजाने कंपनीला ८ कोटी ८२ लाखांचा भुर्दंड सोसावा लागल्याचे कंपनी सांगते. तरीही त्या मॅनेजमेंटविरोधात कंपनी फसवणूक झाल्याची कोणतीही ओरड न करता पुन्हा करारात नसलेली बँकांची ८  कोटी ५० लाखांची कर्जे भागवून संचालकांच्या गळ्याचा फास सोडविल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

याशिवाय मशिनरी आधुनिकीकरणासाठी कंपनीने कोट्यवधी रुपये खर्च केले. संचालकांच्या विनंतीनुसार सभासदांना सवलतीच्या दरात साखर वाटून कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सोसला. इतर कारखाने दहा-दहा महिने कर्मचाऱ्यांना पगार देत नसताना ‘या’ कंपनीने मात्र दरमहा कर्मचाऱ्यांना पगार दिला. तोडणी-ओढणीची आणि शेतकऱ्यांची बिले वेळेत दिली. थोडक्यात, या कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी, कर्मचारी आणि संचालक यांना तारण्याचे काम कंपनीने कोट्यवधी रुपयांचा तोटा सोसत मोठ्या निष्ठेने सुरू ठेवले आहे.

मग यात कंपनीचा काय फायदा..?  ‘गडहिंग्लज’ची कोणती पुण्याई की कसले उपकार..? अशा प्रश्नांच्या उहापोहात सर्वसामान्य जनता आहे. मागील १५ दिवसांपासून कारखान्याच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी त्यांची थकीत देणी आणि निवृत्तीवेतन मिळावे यासाठी येथील प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. पण त्यांचे ‘देणे’ करारादरम्यान ताळेबंदातून गायब झाले होते. शेवटी कर्मचाऱ्यांनी यामध्ये ‘लवाद’ असणाऱ्या साखर आयुक्तांचे उंबरे झिजवल्यावर त्याची जबाबदारी निश्चित झाली. कराराच्या आधीची रक्कम कारखाना आणि कारारानंतरची रक्कम कंपनी देणार आहे. पण कधी..? हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. हाच प्रश्न विचारत ते कामगार अर्धनग्न बसत आहेत, बाजारात भीक मागत आहेत. पण कंपनी आणि कारखाना मात्र त्या कामगारांच्या आंदोलनाचे अवसान संपण्याची वाट पाहत आहेत की काय अवस्था आज दिसते.

‘लॉंग टर्म’ करारासह इथेनॉल, को-जनरेशन आणि वाढीव गाळप क्षमता यामुळेच भविष्यात कारखाना टिकेल अशी कारखान्याची काळजी वाटणाऱ्या कंपनीला देशोधडीला लागलेल्या कामगारांच्या भवितव्याची काळजी वाटणार की नाही, याकडे आता ‘गडहिंग्लज’चं लक्ष लागले आहे.