चंदगड तालुक्यात भाजपला भगदाड ?

0
346

चंदगड (प्रतिनिधी) : दौलत साखर कारखान्याचे माजी चेअरमन गोपाळराव पाटील यांच्या गटाचा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय झाला असल्याचे वृत्त आहे. यामुळे चंदगड तालुक्यातील भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

चंदगड येथे आज (बुधवार) येथे गोपाळराव गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची मेळावा पार पडला. या मेळाव्यात पुढची राजकीय वाटचाल कशी करायची याबद्दल निर्णय घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीपूर्वी गोपाळराव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण राज्यात आणि जिल्ह्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यामुळे कार्यकर्त्यांची म्हणावी तशी शासकीय अथवा इतर कामे होत नाहीत. त्यांना पाहिजे तसे बळ मिळत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.

चंद्रकांतदादा यांचे भरमूअण्णा गटाबरोबर जास्त सलोख्याचे संबंध असल्यामुळे गोपाळराव गटाला भाजपकडून म्हणावे तसे सहकार्य मिळाले नाही. आज जिल्ह्यात पालकमंत्री सतेज पाटील यांचे वर्चस्व वाढले आहे. तसेच गोकुळ, केडीसी आणि  भविष्यात अनेक संस्थांच्या निवडणुका पाहता तालुक्यातील बऱ्याच कार्यकर्त्यांनी गोपाळराव पाटील यांच्यावर पुढची राजकीय वाटचाल काँग्रेसबरोबर करावी असे दडपण आणल्याचे समजते.

आज झालेल्या मेळाव्यात सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करावा असे सुचवले. त्यामुळे निर्णय झाल्याचे समजते. फक्त प्रवेशाची तारीख बाकी आहे. परिणामी, चंदगड तालुक्यात भाजपला मोठे भगदाड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.