नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लता मंगेशकर व सचिन तेंडूलकरने आमच्या अंतर्गत विषयात बोलू नका, आम्ही एक आहोत, असं ट्वीत करून आपल्या देशातील अंतर्गत विषयात नाहक नाक खुपसणाऱ्या परदेशी पॉप स्टारना रोखठोक उत्तर दिलंय. आम्ही एकदिलाने विचार करू, आमचं आम्ही बघून घेऊ हे म्हटल्यावर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व राजू शेट्टी यांना त्रास का होतोय, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. कसाबला बिर्याणी खायला घालणाऱ्या आणि याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत बसल्यावर…आझाद काश्मीर मागणाऱ्या मेहक प्रभूला सोडून देणार, शर्जिलला पळून जायला मदत करणार आणि भारतरत्नांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार? वा रे वा! महाराष्ट्राचे कारभारी लय भारी! अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. या मुद्यावरूनव आता भाजपाने महाविकास आघाडी सरकारसह माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर निशाणा साधला.

प्रसारमाध्यम प्रतिनिधींकडे त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, देशातंर्गत विषयात नाहक नाक खुपसणाऱ्या परदेशी पाँप स्टारना रोखठोक उत्तर दिले म्हणून आता महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचे भयंकर वृत्त आताच समजले. या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, असा प्रश्न विचारायची वेळ आता आलेली आहे. यापेक्षा संतापजनक आणि हीन दर्जाचं राजकारण या महाराष्ट्रात कुणी पाहिलं नाही. उद्धव ठाकरे उत्तर द्या. आमच्या शेतकऱ्यांचे व आमच्या देशातल्या प्रश्नांवर परदेशात चर्चा व्हावी? अजून नेहरू मनोवृत्तीतून काँग्रेस बाहेर पडली नाही आणि आज काँग्रेसबरोबर शिवसेना देखील मिळालेली आहे.