कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील वर्षी महापुरात मच्छीमारांचं मोठे नुकसान झाले. त्याच्या भरपाईची रक्कम मत्स्य कार्यालयाकडून देय आहे. ती दिवाळीपर्यंत मिळावी, अन्यथा नुकसानग्रस्त मच्छीमार आपल्या मुला-बाळांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघाचे जनरल सेक्रेटरी प्रा. एकनाथ काटकर यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, २०१९ मध्ये आलेल्या महापुरामुळे जिल्हयातील अनेक मच्छीमारांच्या जाळ्या वाहून गेल्या. त्याच्या भरपाईपोटी सरकारकडून २ कोटींहून अधिक रक्कम मत्स्य कार्यालयाकडे आली आहे. पण तेथून लाभार्थीपर्यंत पोहच होत नाही. या कार्यालयाकडील आधीच्या अधिकाऱ्यांकडून लाभार्थीकडून १५ टक्क्यांची मागणीही केली जात असल्याची माहिती आहे. अशा अनेक कारणांमुळे भरपाईची रक्कम मिळण्यास विलंब होत आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी लाभार्थींना मिळावी, अन्यथा ठिय्या आंदोलन करणार आहे.

या पत्रकार परिषदेस आनंद भोई, सुधाकर शिर्के, हर्षदा पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.