…तर ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो : राज ठाकरे

0
50

मुंबई (प्रतिनिधी) : ‘एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चे कर्तृत्व समजू लागतो. त्या दिवसापासूनच त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो’, असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विटरवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळल्याने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटरवर दिली आहे.

राज्यात अलीकडेच गाजलेले भोंगे वाद प्रकरणी मनसे सैनिकांची ठिकठिकाणी धरपकड करण्यात आली होती. तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केले आणि अनेकांना तुरुंगात डांबले होते. तेव्हा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखे वागत आहे. सहनशीलतेचा अंत पाहू नका, सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी येत नाही, असेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटले होते.