…तर शिवसेनेचे अस्तित्व राहिले नसते : अमित शहा

0
410

सिंधूदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रत्येक ठिकाणी एनडीएचे सरकार निवडून देण्याचे आवाहन केले. देवेंद्र फडणवीसच  मुख्यमंत्री होणार, असे सांगितले. त्यावेळी का नाही बोलला? असा सवाल करून  मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतेही वचन दिलेले नव्हते, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठणकावून सांगितले. तसेच फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असतो, तर तुमच्या पक्षाचे अस्तित्व राहिले नसते, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर घणाघात केला.

भाजप नेते नारायण राणे यांच्या लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते आज (रविवार) झाले. त्यानंतर आयोजित सभेत शहा यांनी शिवसेनेसह राष्ट्रवादी, काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला.

आम्ही वचनावर ठाम राहणारी माणसं आहोत. हे आम्ही बिहारमध्ये नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करून दाखवले आहे. एका खोलीत वचन दिले होते. पण मी काही खोलीत करत नाही. जे करतो ते सगळ्यांसमोर करतो. डंके की चोट पर करता हूँ. मी कधीही बंद दाराआडील राजकारण केले नाही. मी शिवसेनेच्या मित्रांना सांगू इच्छितो की, तुम्ही सिद्धांतांसाठी आलेला नाहीत. बाळासाहेब गेले. आता राजकारणासाठी सिद्धांतांची तोडमोड सुरू आहे. पण, महाराष्ट्रातील जनतेला चांगले माहिती आहे. मी इतकंच सांगू इच्छितो की, आम्ही तुमच्या रस्त्यावर चालणार नाही, अशीही टीका शहा यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसवर केली.