पुणे (प्रतिनिधी) : दक्षिण आफ्रिकेसह बोट्स्वाना, हाँगकाँग या भागात कोरोनाचा ओमिक्रोन हा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. त्यामुळे जगभरात पुन्हा चिंता वाढली आहे. राज्यात हा नवीन व्हेरिएंट रोखण्यासाठी मुख्यमंत्री सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. राज्यात नवीन व्हेरिएंट आढळल्यास  काही बंधने पुन्हा आणावी लागतील, अशी शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. ते पुण्यात कोरोना आढावा बैठकीत बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, वैद्यकीय संस्था एम्सने नव्या व्हेरिएंटबाबत गंभीर इशारा दिला आहे. आपल्याकडे परिस्थिती बरी आहे. परंतु जागतिक पातळीवर नवीन व्हेरिएंटचा फैलाव होत आहे. हा फैलाव रोखण्याबाबत पंतप्रधान देशातील मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. तसेच परदेशातील येणाऱ्या विमानांबाबतही पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. सध्या पुणे जिल्ह्यात समारंभांसाठी ५० टक्के उपस्थितीचे बंधन हटवण्यात आले आहे. आता शाळा देखील पूर्ण क्षमतेने सुरू करत आहेत. तसेच १ डिसेंबरपासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहेत.