मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या वेळी अडीच अडीच वर्षे हेच ठरले होते. आता मग हे सगळे करण्याचं कारण काय? हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळला असता तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

भाजपवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, अडीच वर्षापूर्वी मी अमित शहा यांना अडीच वर्षाचा फॉर्मुला सांगितला होता. मी अडीच वर्षाचा करार करायला तयार होतो. अडीच अडीच वर्षाचा काळ वाटून घ्यावा अस ठरले होते. याबद्दल अमित शहांनी मला वचन देखील दिले होते; पण त्यांनी त्यांचा शब्द मोडला. ठरल्याप्रमाणे केल असते, तर भाजपला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळाले असते; पण अमित शहा यांनी दगा दिला.

जे आज केले ते अडीच वर्षापूर्वी का केले नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना केला. माझ्या पाठीत खंजीर खुपसला तो मुंबईच्या काळजात नको. २०१९ मध्ये पहिला मुख्यमंत्री शिवसेनेचा किंवा भाजपचा झाला असता. जे भाजपसोबत आज गेले त्यांनी भाजपला हा प्रश्न विचारायला हवा, असे सांगून ठाकरे म्हणाले, कांजूर मार्गाचा निर्णय कायम राहू द्या. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. आरेत कारशेड उभारु नका.

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याचे मानायला नकार दिला. सत्ता येते सत्ता जाते, सत्ता परत येते मात्र, ज्या पद्धतीने तुम्ही सर्वांचे प्रेम जर क्वचित कुणाला लाभत असेल तर ते मला लाभले आहे. ज्या विचित्र पद्धतीने शिवसेना प्रमुखांचा पुत्र मुख्यमंत्री पदावरून उतरवून स्वतः जो काही मुख्यमंत्री होण्याचा अट्टाहास केला हा जनतेला आवडेल न आवडेल हे जनता ठरवेल, असेही ठाकरे म्हणाले.