‘त्यांची’ अवस्था तबलिगी जमातसारखी होऊ शकते : सर्वोच्च न्यायालय

0
85

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली परिसरात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत असलेले शेतकरी कोरोना विषाणूपासून सुरक्षित आहेत की नाहीत, याची आम्हास माहिती नाही, असे सांगतानाच शेतकरी आंदोलनाची स्थिती तबलिगी जमातसारखी व्हावयास नको, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका खटल्याच्या सुनावणीवेळी केली. शेतकरी आंदोलनादरम्यान कोरोना नियमांचे पालन केले जाऊ शकते का, अशी विचारणाही न्यायालयाकडून यावेळी केंद्र सरकारला करण्यात आली.

आंदोलनकर्ते शेतकरी कोरोनापासून सुरक्षित आहेत की नाहीत, याची आम्हास माहित नाही, असे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सांगितले. नियमांचे पालन करण्यात आले नाही तर शेतकरी आंदोलनाची अवस्था तबलिगी जमातसारखी होऊ शकते, असा इशाराही न्यायालयाने दिला. कोरोना नियमांचे पालन केले जात आहे की नाही, तसेच इतर अनुषांगिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी सांगितले. यासंदर्भात दोन आठवड्यात अहवाल सादर केले जावे, असे निर्देशही सरन्यायाधीश बोबडे यांनी दिले.