करवीर (प्रतिनिधी) : इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या गोदामातून वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रो ओव्हन, वॉटर पुरिफायर आदि ९९ हजार २४१ रुपयांचा मुद्देमाल संगनमताने लंपास केला. याबाबत कामगार गणेश संजय पोळ, मयूर सुनिल पोवार (दोघेही रा. जवाहरनगर, कोल्हापूर), राहुल जयकांत येलेकर (रा. सोमवार पेठ, कोल्हापूर) आणि साहिल मन्सूर देसाई (रा. कुशिरे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक कन्‍हैयालाल केसवाणी (रा. ताराबाई पार्क, कोल्हापूर) यांचे गांधीनगर येथे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे गोदाम आहे. त्यांच्याकडे गणेश पोळ, मयूर पोवार, राहुल येलेकर आणि साहिल देसाई असे चार कामगार होते. या चौघांनी केसवाणी यांना न सांगता गेल्या दोन महिन्यांपासून आजअखेर २१ हजारांची आटा चक्की, १५, ७५० रुपयांचे मायक्रो ओव्हन, २२ हजारांचे वॉशिंग मशीन आणि ४० हजार ४९१ रुपयांचे नऊ पुरिफायर असा एकूण ९९ हजार २४१ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

यावेळी केसवाणी यांच्या निदर्शनास ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी गांधिनगर पोलीस ठाण्यात या चौघा संशयितांविरुद्ध फिर्याद दिली असून त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.