फार्मासिस्टचे कार्य नेहमीच कौतुकास्पद : आ. विनय कोरे

0
65

कोल्हापूर (प्रतिनिधी) : फार्मासिस्ट आपल्या सेवेच्या माध्यमातून कायमच समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत असतात. कोरोनाच्या काळात कोल्हापूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून झालेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांनी योग्यवेळी औषधांची उपलब्धता केल्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचल्याचे वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समाजाचे अध्यक्ष आ. डॉ. विनय कोरे यांनी सांगितले.

तसेच वारणा सायन्स अँड इनोवेशन ॲक्टिव्हिटी सेंटर आणि मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शनिवारी विज्ञानवारी’ उपक्रमांतर्गत ग्रामीण, दुर्गम भागातील शाळांमध्ये विज्ञान प्रसाराचे काम करणाऱ्या विज्ञानदुतांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा यांनी, फार्मासिस्टने कोरोना काळामध्ये केलेल्या कामांची आठवण करुन दिली. तसेच कोणत्याही फार्मासिस्टचा ‘कोविड योद्धा’ म्हणून उल्लेख होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी, बदलत्या काळानुसार सुधारीत शिक्षणपद्धतीसह कौशल्यपूर्ण फार्मासिस्ट घडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. तसेच प्राचार्य डिसोझा यांच्या पुढाकाराने राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांचे कौतुक केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय संघटनेचे संघटन सचिव मदन पाटील, रवींद्र पाटील, नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजी ढेंगे यांची भाषणे झाली. केडीसीएचे नवनिर्वाचित पदाधिकारी शिवाजी ढेंगे, प्रल्हाद खवरे, भरतेश कळंत्रे, सचिन पुरोहित, भुजंगराव भांडवले, संदीप मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, प्रा. सुप्रिया गायकवाड, ॲड. राजेंद्र पाटील, शाहुवाडी पन्हाळ्यातील फार्मासिस्ट, विज्ञानदुत, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.