कोतोली (प्रतिनिधी) :  लोकांनी मनावर घेतले  तर काय बदल घडू शकतो. हे कोतोली येथे लोकसहभागातून तलाठी कार्यालय उभारून लोकांनी दाखवून दिले आहे. शासकीय किंवा इतर कामात लोकांचा सहभाग असेल, तर त्यामध्ये जिवंतपणा येतो, त्यामुळे त्याचा लाभ सर्वांना घेता येतो, असे  प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई  यांनी केले.

कोतोली  (ता.पन्हाळा) येथे लोकसहभागातून तब्बल १७ लाखांचे तलाठी कार्यालय उभारले आहे.  या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी  ते बोलत होते. मंडलाधिकारी सतिश ढेंगे व सहकार्‍यांनी लोकसहभागातून कार्यालय उभारण्याचा चंग बांधला होता. बघता बघता सहा महिन्यांमध्ये दुमजली इमारत उभारण्यात आली. या सुसज्ज अशा इमारतीचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाला.

उद्योगपती सोपान पाटील यांनी बांधकामासाठी सढळ हाताने मदत केल्याने त्यांचे जिल्हाधिकार्‍यांनी विशेष कौतुक केले. दरम्यान, दामोदर पाटील सभागृहाचे उद्घाटन उद्योगपती सोपान पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रांतधिकारी बी. आर. माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, जि.प. सदस्य शंकर पाटील, सरपंच प्रकाश पाटील, महिपती चौगले, राजेंद्र लव्हटे, तालुक्यातील महसूल विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ  आदी उपस्थित होते.