पुणे (प्रतिनिधी) : बस चालवत असताना चालकाला फिट आल्याने तो खाली पडला. त्यानंतर प्रसंगावधान राखत बसमधील एका रणरागिणीने बसचे स्टेअरिंग हाती घेत २२ महिलांचा जीव वाचवला. हा थरारक प्रसंग पुणे-अहमदनगर रस्त्यावर गुरुवारी घडला. योगिता सावत असे त्या महिलेचे नांव असून तिच्या धाडसाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.      

याबाबतची अधिक माहिती अशी की, २२ महिलांचा एक ग्रूप पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथे सहलीसाठी निघाला होता. यावेळी अचानक बस चालवत असताना चालकाला फिट आली. त्यामुळे बसमधील सर्वांची घाबरगुंडी उडाली. त्याचवेळी बसमधील एका महिलेने सर्वांना धीर देत प्रसंगावधान दाखवत चालकाच्या सीटवर बसून बसवर नियंत्रण मिळवले.

बस चालवतानाच फिट आल्यामुळे चालक खाली पडला, त्याचे डोळे पांढरे झाले, हात- पाय वाकडे झाले. त्यावेळी योगिता सातव यांनी धाडस करत बसचे स्टेअरिंग  हातात घेत चालकाला तातडीने रूग्णालयात नेले. आणि सर्व सहकारी महिलांना सुखरुप घरी पोहोचवले. या बाका प्रसंगाचा धैर्याने सामना करत योगिता सातव हिने एका कणखर महिलेचे दर्शन दाखवून दिले. भांबावून न जाता बिकट परिस्थिती कौशल्याने हाताळल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.