गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कारखाना चालवायला द्या अथवा स्वबळावर चालवा, पण निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी दिल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत कारखान्याची चाके फिरू देणार नाही, असा इशारा शिवाजीराव खोत यांनी दिला. आज (मंगळवार) सूर्या हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ते बोलत होते.

यावेळी खोत यांनी कारखान्याचे चेअरमन श्रीपतराव शिंदे, व्हाईस चेअरमन संग्रामसिंह नलवडे यांच्यासह संचालक मंडळावर अनेक घणाघाती आरोप केले. चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्या कारखाना सुरू करण्याचा श्रेयवादातून गळीत हंगाम बंद पडत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय नलवडे यांनी ‘ब्रिस्क’ सोबतचा करार चुकीच्या पद्धतीने झाल्याचे केलेल्या विधानाचा खोत यांनी समाचार घेताना करारादरम्यान आठ वर्षात नलवडे यांना ही गोष्ट का कळली नाही? असा प्रश्न उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, व्यवसायाने आणि स्वभावाने वकील असलेल्या शिंदेचा वकिली हाच स्थायीभाव बनलाय आणि ते त्याच भावनेनं कर्मचाऱ्यांशी वागत आहेत. विशेष सभेमध्ये ‘कर्मचाऱ्यांची देणी’ बाबतचा विषय ऐनवेळी नाकारल्यावरूनही खोत यांनी शिंदेना लक्ष्य केले. सहकारात अशी सभा होऊच शकत नसल्याचे ते म्हणाले. सगळ्या बँकांना भेटी दिल्याच्या मुद्द्यावरूनही खोत यांनी शिंदे यांची खिल्ली उडवताना एका जिल्हा बँकेला भेटल्यानंतर कर्ज नाकारण्याची जी कारणे सांगितली असतील तीच इतर बँकाही सांगणार, मग इतक्या बँकांना भेटलो हे फक्त सभासदांची दिशाभूल करण्यासाठी केलंय.

मूल्यांकन वाढवून कारखान्याचा संचित तोटा भरून काढण्याच्या मुद्द्यावर खोत म्हणाले की यापूर्वीच शिंदे साहेब चेअरमन असताना ‘हे’ केलं आहे. त्यावेळी अशा पद्धतीने तोटा मुरवून घेतलेल्या कर्जाचे वाटप कुठं केलं? आता पुन्हा त्याच पद्धतीने मूल्यांकन वाढविणे आणि तोटा भरून काढणे शक्य नसून ही फक्त सभासदांच्या डोळ्यात धूळफेक असल्याचे खोत यांनी सांगितले. शिवाय कारखाना जवळपास ११० कोटी कर्जात असून आपण ते लवकरच सिद्ध करू, असा दावाही खोत यांनी केला.