नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या २० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी हटून बसले आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकार शेतकऱ्यांना कृषी कायदे कसे योग्य आहेत, हे पटवून देईल, समजावून सांगेल. आणि चर्चेच्या माध्यमातून यावर मार्ग काढला जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

एका मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्याला सांगितले, तर आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत कृषी आणि वाणिज्य मंत्री शेतकऱ्यांसोबत चर्चा करत आहेत. जर मला चर्चा करण्यासाठी सांगितले, तर मी नक्कीच त्यांच्याशी बोलेन, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

चर्चाच केली नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होऊ शकतात. चर्चेतून तोडगा काढून संपूर्ण प्रकरणच मिटवता येईल. शेतकऱ्यांना न्याय आणि दिलासा देण्याच्या  दृष्टीने आम्ही काम करत आहोत, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.