कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले- इचलकरंजी रस्त्यावरील कोरोची माळावर झालेल्या शुभम उमेश कमलाकर ( वय २१, रा. बिरदेव मंदिरासमोर हातकणंगले) या तरुणाचा खुनाचा उलगडा त्याच्याच व्हॉट्स अॅपवरील स्टेटसवरून होण्याची शक्यता आहे. संजय दत्तची प्रमुख भूमिका असलेल्या ‘वास्तव’ या चित्रपटातील एका हत्येचा सीन या स्टेटसमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. या खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसताना शुभमने आपल्या व्हॉट्सअॅपवर ठेवलेल्या स्टेटसची चर्चा परिसरात होऊ लागली आहे. या स्टेटसवरून वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

‘धोके को कभी भुलाया नही जाता’, उसका बारी बारी से हिसाब किया जाता है ! अशा आशयाचा उल्लेख स्टेट्सवर आहे. तसेच अभिनेता संजय दत्त याचा गाजलेला चित्रपट ‘वास्तव’मधील हत्येचा सीन स्टेटसंवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अशा आशयाचा स्टेटस ठेवण्यामागे शुभमचा उद्देश काय असावा, याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

शुभम रिक्षा चालवत होता. तसेच वेल्डिंगच्या दुकानात काम करत होता. मंगळवारी रात्री काम संपल्यानंतर तो मित्रांसोबत कोरोची माळावर गेला होता. यावेळी त्यांनी मद्यप्राशन केले होते. त्यानंतर त्यांच्यात वाद होऊन मारेकऱ्यांनी शुभमचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याची ओळख पटू नये म्हणून त्याच्या चेहऱ्यावर सिमेंटच्या खांबाने वर्मी घाव घालून चेहरा विद्रूप केला. दरम्यान, शुभमचे मित्रांसोबत वाद का झाला याचा उलगडा शुभमने ठेवलेल्या स्टेटसवरून होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.