शेडशाळ येथे ताटात रस्सा पडल्याच्या कारणावरुन दोघांवर कटरने वार…

0
47

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : ताटात रस्सा पडल्याच्या कारणातून वाद होऊन दोघांवर कटरने हल्ला केला. या घटनेत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शाहिद शेख उर्फ ओंकार माने (वय २५), अमीन पटेल (वय २४, दोघे रा.औरवाड, ता.शिरोळ) अशी जखमींची नावे आहेत. मिरज येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी रात्री उशीरा घडली. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीसातून मिळालेली माहिती अशी की, शेडशाळ (ता. शिरोळ) येथील हॉटेल समाधान ढाबा येथे ओंकार शिकलगार, प्रकाश शिकलगार (रा. औरवाड, ता. शिरोळ) आणि कुलदीप संकपाळ (रा. शेडशाळ, ता. शिरोळ) आणि ओंकार माने, अमीन पटेल हे जेवायला बसले होते. यावेळी  एकमेकाला धक्का लागल्याने, ताटात रस्सा पडल्याने वाद झाला. या वादावादीचे मारामारीत रूपांतर झाले. यावेळी ओंकार शिकलगार याने खिशातील कटरने माने आणि पटेल यांच्यावर वार करून त्यांना जखमी केले.

या जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी सपोनि. बालाजी भांगे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी तणावपूर्ण वातावरण असल्याने औरवाड परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांनी पहाटे घटनास्थळी व कुरुंदवाड पोलीस ठाण्याला भेट देऊन या घटनेची माहिती घेतली.