कोल्हापूर (प्रतिनिधी) मुंबईतून येऊन कोल्हापूरसह परिसरातील चारचाकी वाहनांतून कारटेप चोरणाऱ्या दोन अटल चोरट्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४ लाख रूपये किंमतीची २० कारटेप जप्त केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज (गुरूवार) शिये फाटा येथे केली.

जुबेर रईस अहंमद (वय ३१ नालासोपारा, मूळ रा. उत्तरप्रदेश), जगन्नाथ रामनाथ सरोज (वय ४५ रा. सिद्धार्थनगर, चेंबूर नाका मुंबई मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्याची नांवे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत कोल्हापूर शहरात रात्रीच्या सुमारास पार्किंग केलेल्या कारमधून टेप चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी एक पथक नेमले होते. हे पथक १५ नोव्हेंबररोजी शिये फाटा येथे गस्त घालत असताना काही संशयित इसम संशयास्पदरित्या आढळून आले. पोलिसांनी त्यांची  कसून चौकशी केली असता शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ९ व राजारामपुरी पोलीस ठाण्यातील १ असे दहा कारटेप कोल्हापुरातून चोरल्याची कबुली दिली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे हे चोरटे मुंबईतून येऊन कोल्हापूरात रात्रीच्या सुमारास चोरी करून पुन्हा मुंबईला जात असल्याचे त्यांनी चौकशीदरम्यान सांगितले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, राजेश आढूळकर, अजय वाडेकर यांच्यासह आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.