कोल्हापूर (प्रतिनिधी) : विवाहाची नोंदणी करून दाखला देण्यासाठी ३ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ग्रामीण रुग्णालयाच्या कनिष्ठ लिपिकासह दोन पंटरवर आज (बुधवार) कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून कारवाई केली.

सुधीर अमितचंद चौधरी (वय ४५, कनिष्ठ लिपिक, हातकणंगले ग्रामीण रुग्णालय, रा. रुक्मिणी हौसिंग सोसायटी, संजयनगर, सांगली) व खासगी इसम सचिन शिवाजी भोसले (रा. नेज, ता. हातकणंगले) अशी कारवाई करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, हातकणंगले येथील तक्रारदार यांच्या विवाहाची नोंदणी करून दाखला देण्यासाठी कनिष्ठ लिपिक सुनील चौधरी व पंटर सचिन भोसले यांनी ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर पंटर सचिन भोसले याने सदरची लाचेची रक्कम दुसऱ्या पंटरकडे  देण्यास सांगितले. दरम्यान, आज लाच घेताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संजीव बंबरगेकर, पोलीस नाईक विकास माने, सुनिल घोसाळकर, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश माने, सूरज अपराध यांच्या पथकाने केली.