कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देवीच्या विविध धार्मिक विधींच्या कार्यक्रमांवेळी सनईच्या मंजूळ सुरांनी भक्तिमय वातावरण निर्माण करणारे सनई वादक चंद्रकांत आकाराम पोवार (वय ५६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने मंदिर परिसरातील सनईचे सूर आता पोरके झाले. ते तामजाई कॉलनी, गंगाई लॉन बोंद्रेनगर येथे वास्तव्यास होते.

अंबाबाई मंदिरात तिन्ही त्रिकाळ चंद्रकांत पोवार यांच्या सनई वादनाचे मंजूळ स्वर ऐकू येत होते. मंदिरात देवीचे वाद्य म्हणून सनई चौघडा आणि पितळी थाळी यांना मानाचे स्थान आहे. या वाद्यासाठी परंपरागतपणे काही कुटुंबाना मानाचे स्थान होते. यामधील चंद्रकांत यांचे वडील आकाराम पोवार हेदेखील आपली सनई वादनाची सेवा देवीला अर्पण करत असत. त्यांच्या पश्चात चंद्रकांत पोवार हे अंबाबाई मंदिरात दीर्घकाळ सनई वादनाची सेवा बजावत होते.

कार्तिकीनंतर मंदिराच्य शिखरावर काकडा प्रज्वलित करताना रात्री अडीच वाजल्यापासून हा सनई चौघडा निरंतर वाजत असतो. ललिता पंचमी आणि दसऱ्याला निघणाऱ्या पालखी मिरवणुकीसोबत किंवा नगर प्रदक्षिणेला बाहेर पडताना देवीच्या वाद्यांसोबत चंद्रकांत पोवार हे चौघड्याला साथ देत असत. चंद्रकांत पोवार यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भावंडे असा परिवार आहे.