कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना काळात जागतिक फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. आजाराला न घाबरता सत्य काय आहे. ते बघावे आणि फसवणुकीपासून सावध राहावे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा, असे आवाहन डॉ. पवन गायकवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ येथे कृती फांऊडेशनच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते.

डॉ. गायकवाड म्हणाले की, विविध संशोधकांनी जागतिक आरोग्य संघटनेवर शंका घेतली आहे. जगातील जपान, व्हिएतनाम अशा अनेक देशांनी जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व सूचना नाकारल्या आहेत. आपल्या देशाने सुद्धा सत्य पडताळून नागरिकांना फसवणुकीपासून रोखावे. सावित्रीबाई यांच्यासारख्या महिलांनी सत्य स्वीकारून सर्वांना प्रकाश दिला. आता आधुनिकता असूनही सत्यता पडताळणी केली जात नाही. त्यामुळे सर्वत्र फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. यापासून आपण वेळीच सावध राहायला हवे.

अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक तृप्ती चव्हाण होत्या. यावेळी सचिव अमित कांबळे प्रमुख उपस्थित होते.यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर आधारित सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

विठू रामचंद्र हराळे (नागाव ता.करवीर), गजानन पाटील, सत्यनारायण भैरूलाल परिक, (इस्पुरली ता. करवीर), संतोष राठोड (निगवे खालसा ता.करवीर), तुषार पाटील (कणेरी ता. करवीर), प्रेमिला माने, हेमलता शिंदे (पाचगाव ता.करवीर), दत्तात्रय सुतार (चुये ता. करवीर), यांचा सत्कार केला. प्रशांत चुयेकर यांनी प्रास्ताविक केले. अनिता काळे यांनी सूत्रसंचालन केले. पी.आर.कांबळे यांनी आभार मानले.