‘काळ आला होता पण..’ : पांगिरेच्या युवकांनी लावली जीवाची बाजी

0
531

गारगोटी (गारगोटी) : वाहन चालकाचा आतीशाहणपणा कधी कधी अंगलट येतो. पण, नशीब बलवत्तर म्हणून आज एका खाजगी बसमधील १४ जणांचे प्राण वाचवण्यात येथील युवकांना यश आले. ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ अशीच काहीशी परिस्थिती काल गुरुवार (रात्री) पांगिरे येथे आला. स्थानिक जिगरबाज युवकांनी बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. हा थरारक प्रसंग रात्री अडीच वाजता घडला.

गोवा येथून कोल्हापूरकडे जाण्यासाठी ही खाजगी बस गारगोटी गडहिंग्लज राज्यमार्गावर पांगिरे पुलावर आज मध्यरात्री अडीच वाजता आली. या रस्त्याचा अंदाज नसलेने बस चालकाने बस पाण्यात घातली. पण पाण्याचा प्रवाह मोठा असलेने चालकाला बस पुढे नेता आली नाही. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने बस वाहून जाऊ लागली व ही बस पुलाच्या उजव्या बाजूच्या कठड्याला जाऊन अडकली. त्यावेळी गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना आपण पाण्यात अडकल्याची कल्पना आली आणि त्यांनी जोरदार आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. पांगिरे येथील दिगंबर पाटील यांना त्यांचा आवाज ऐकू आला. दिगंबर यांनी लगेच अमोल चव्हाण यांना फोन केला. ही बातमी सर्वांना समजताच सर्वजण नदीवर धावत गेले.

खाजगी बसमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु केले.पाण्याचा वेग खूपच होता. त्यामुळे अडकलेल्या बसपर्यंत जाणे इतकं सोपं नव्हते. यावेळी नदीच्या अलीकडे एक मालवाहू ट्रक उभा होता. त्या ट्रकला रोप बांधून त्याच्या साह्याने रोप घेऊन हे सर्व युवक बसजवळ पोहोचले आणि जीवाची बाजी लावून या जिगरबाज युवकांनी तासाभराच्या अथक परिश्रमानंतर बसमध्ये असणाऱ्या सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात यश मिळवले.

भुदरगड तालुक्यातील पांगिरे या गावचे भैरू चव्हाण,अमोल चव्हाण निलेश भराडे, दिगंबर पाटील, निखिल भराडे, अमोल हसुरकर, संकेत बोरनाक, नामदेव गडकरी व मालगाडी चालक यांनी या प्रवाशांचे जीव वाचवले.विशेष म्हणजे हे सर्व प्रवाशी नेपाळ या देशातील असून गोवा येथून ते कोल्हापूर व पुढे जाणार होते. सर्वच वाहतूक बंद असलेने या सर्वांची भोजनाची व्यवस्था पांगिरे ग्रामस्थ करत आहेत.