नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना एक चिंताजनक बातमी आली आहे. कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यात उच्चांक गाठू शकते, असा इशारा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या तज्ज्ञांच्या समितीने दिला आहे. या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचेही या समितीने पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे.

ज्या प्रमाणात लहान मुलांना कोरोनाची लागण होऊ शकते, त्या प्रमाणात आपल्याकडे आत्ता पुरेशा आरोग्यसुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे सहव्याधी असलेल्या तसेच दिव्यांग असलेल्या लहान मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचनाही या अहवालात केलेली आहे. कितीही खबरदारी घेतली तरीही कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर अखेरपर्यंत येऊ शकते, असेही समितीने म्हटले आहे.

दरम्यान, लहान मुलांवर कोरोना विषाणूचा अतिगंभीर परिणाम होणार नसला तरीही या मुलांमुळे इतरांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. तसेच तिसरी लाट मागील दोन लाटांपेक्षा सौम्य स्वरुपाची असेल, असेही समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे.