कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरसह जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्या लाटेचा धोका अटळ आहे, त्यामुळे निर्बध लावावेच लागणार आहेत. मात्र, ६५ ते ७० टक्के लोकांवर घरीच उपचार करता येतील. तर काही लोकांनाच आयसीयू आणि ऑक्सिजनची आवश्‍यकता लागणार आहे. त्यामुळे काळजीचे कारण नाही. केवळ निर्बंध पाळणे आवश्‍यक असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (बुधवार) येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.  

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, सध्या कोल्हापुरात रूग्णसंख्या कमी आहे, टेस्टींग ही कमी आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेवून ऑक्सिजन आणि बेडची उपलब्धता करण्यात आली आहे. तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लॅन्ट बसविले आहेत. मुंबईतील लोक गावी आल्यानंतर पुन्हा येथील रूग्णसंख्या वाढणार आहे. त्याचीही तयारी प्रशासनाने केलेली आहे.

फ्रंट वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच   सर्व व्यापाऱ्यांची पुन्हा लॉकडाऊन नको, अशी मानसिकता आहे. तरीही कडक निर्बंध लावणे आवश्‍यक आहे. लहान मुलांना संसर्गापासून रोखण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे. कर्नाटकात ॲन्टीजेन टेस्ट, आरटीपीसीआर सक्तीचे करण्यात आले आहे. परंतु, राज्यात आणि देशात एकच निर्बंध लावणे आवश्‍यक आहे, असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.