जालना : जालना जिल्ह्यातील ‘समर्थ रामदासांच्या जन्मगावी ‘जांब समर्थ’ येथील राम मंदिरातून पहाटेच्या सुमारास  ७०० वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या आहेत. या संदर्भातील मुद्दा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा तपास केला जाईल. तसेच चोरट्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती दिली.

महाराष्ट्रासह मुंबईतून अनेक लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या घटनेची दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी केली आहे. समर्थ रामदासांनी स्थापित केलेली राम लक्ष्मण सीतेची मूर्ती देखील चोरीला गेली आहे. ऐतिहासिक पंचायतन (राम लक्ष्मण सीता, भरत, शत्रूघ्न) देखील चोरीला गेले आहे. समर्थ झोळीत ठेवत असलेली तसेच दंडात बांधत असलेल्या मारोतीच्या मूर्ती देखील चोरीला गेल्या आहेत.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी रात्री ३ च्या सुमारास चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त केला. पाळत ठेऊन मंदिरातील चावी घेऊन चोरी केल्याचे सांगण्यात येत आहे.