पोलीस अधीक्षकांनी घेतली वरदच्या कुटुंबियांची भेट

0
221

कागल (प्रतिनिधी) : वरदच्या खूनप्रकरणाचा तपास करण्यासाठी १० पथके तयार केली आहेत. आरोपीला फाशी होण्यासाठी आवश्यक तो तपास व सबळ पुरावे गोळा केले जातील. वरदच्या कुटुंबियांसोबत पोलीस दल आहे. चांगला सरकारी वकील दिला जाईल, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज (रविवार) दिला. सोनाळी (ता. कागल) येथील खून झालेल्या वरद रवींद्र पाटील  या बालकाच्या कुटुंबीयांची बलकवडे यांनी भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी आरोपीला फाशी द्या. पंचांग पाहणार्‍या आरोपीच्या भावाला अटक करा, आरोपीला फाशी देण्यासाठी चांगला सरकारी वकील नेमा, आरोपी मारुती वैद्यसारखा दुसरा मारूती पुन्हा जन्माला येऊ नये, यासाठी आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी कुटुंबियांनी केली.

कुटुंबियांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी गावातच कुटुंबियांचे व ग्रामस्थांचे जबाब घेण्यात येणार आहेत. तरी आरोपीला फाशी होण्यासाठी आवश्यक ते सर्व पुरावे गोळा करण्यासाठी कुटुंबियांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन बलकवडे यांनी केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, मुरगूडचे सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे, पोलीस नाईक स्वप्नील मोरे आदी उपस्थित होते.