कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली येथील शेतकरी नामदेव पांडुरंग सुतार यांनी बँक खातेवर जमा झालेले १२ हजार रुपयांचे अनुदान लाभार्थी भीमराव पाटील यांना प्रामाणिकपणे परत केले.

नामदेव सुतार यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कळे येथील शाखेत बचत खाते आहे. या खात्यावर नजरचुकीने स्वच्छतागृहाचे अनुदान १२ हजार रुपये वर्ग झाले होते. सुतार हे खात्यावरील पैसे काढण्यासाठी गेले असता  खात्यावर जादा पैसे जमा झाल्याचे त्यांच्या निर्देशनास आले. याबाबत बँकेत चौकशी केली असता स्वच्छतागृहाचे अनुदान जमा झाल्याचे समजले. पैसे कुणाचे जमा झाले आहे. त्या खातेदार व्यक्तीचा पत्ता शोधला असता ती व्यक्ती गावातील असल्याचे समजले. भीमराव लहू पाटील (रा. सावर्डे तर्फ असंडोली) असे या लाभार्थ्याचे नाव आहे.

शहानिशा करून सुतार यांनी प्रामाणिकपणे १२ हजार रुपये भीमराव पाटील यांना त्यांच्या घरी जाऊन सुपूर्द केले. या प्रामाणिकपणाबद्दल परिसरातून सुतार यांचे कौतुक होत आहे. यावेळी ग्रा.पं. सदस्य महेश भोसले, धनाजी पाटील, दत्तात्रय बच्चे, सचिन सुतार, संदीप सुतार आदी उपस्थित होते.