मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अनलॉक करण्यासाठी राज्य सरकार ‘ओपनिंग अप’ हे सूत्र अवलंबणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. कोणकोणते निर्बंध कशा पद्धतीने हटवून सवलती देण्यासंदर्भातील अहवाल टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे. या आठवड्यात टास्क फोर्सच्या सदस्यांची मुख्यमंत्र्यांसोबत अहवालावर चर्चा होऊन टप्प्याटप्प्याने निर्बंध हटवण्याचा निर्णय होईल, अशी बातमी एक वृत्तवाहिनीने दिली आहे.

सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय मात्र लगेचच घेतला जाण्याची शक्यता कमी आहे. टप्याटप्याने सर्व आस्थापना सुरू करण्याचा प्लॅन तयार आहे. वेळ वाढवण्याबरोबरच उपस्थितीची मर्यादाही शिथील केली जाणार. लसीकरण झालेल्या नागरिकांना उपस्थितीमध्ये प्राधान्य दिले जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडण्यासाठी सवलती जाहीर केल्या जाणार आहे. यामध्ये रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची वेळ रात्री १० पर्यंत केली जाणार आहे. ५० टक्केची मर्यादाही काही प्रमाणात शिथिल केली जाण्याची शक्यता आहे. यासाठी हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे गरजेचे आहे. लसीकरण झालेल्या ग्राहकांना रेस्टॉरंटमध्ये प्रवेश देण्यात प्राधान्य देण्यासंदर्भात विचार सुरू आहे. शक्य असेल तिथे मोकळ्या जागांमध्ये डायनिंगची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर दुकाने सुरू ठेवण्याची वेळही वाढवून दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुकानांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.