मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यभरात शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) राज्य सरकारने नियमावली प्रसिद्ध करून  ‘यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा’ असं आवाहन केले आहे. मागील वर्षाप्रमाणे सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूट असावी, अशी सूचनाही सरकारकडून करण्यात आली आहे.

गृहविभागाकडून गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे. यामध्ये मागील वर्षीप्रमाणेचे यंदाही सारखेच नियम लागू केले आहे.

काय आहे नियमावली ?

१) गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित,  शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. नागरिक देतील ती वर्गणी स्वीकारावी. २) गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. ३) श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळासाठी ४ फूट आणि घरगुती गणपतीसाठी २ फुटांच्या मर्यादेत असावी. ४) यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू किंवा संगमरवर अशा मूर्तीचं पूजन करावं. मूर्ती पर्यावरणपूरक असल्यास त्याचं विसर्जन शक्यतो घरी करावं. घरी शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम स्थळी विसर्जन करावं. ५) सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यपूरक उपक्रम राबवण्यावर भर दिलं जावं. तसेच या माध्यमातून डेंग्यू, मलेरिया, कोरोना सारख्या आजारांची नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. ६) राज्य सरकारकडून वेळोवेळी लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain चे नियम कायम राहतील. ७) त्याचबरोबर आरती, भजन, किर्तन असा धार्मिक कार्यक्रमांत गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियम आणि तरतूदींचं काटेकोर पालन करण्यात यावं. ८) श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. ९) प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम मास्क, सॅनीटायझर इत्यादी पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. १०) श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. ११) गणेशमूर्तीच्या विसर्जनाकरता कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.