मतलबी अधिकाऱ्यांमुळे ‘आत्मा’तील ‘आत्मा’च हरवला…

0
367

कोल्हापूर (उत्तम पाटील) : शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी आणि विविध योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून शासनाने ‘आत्मा’ संस्थेची निर्मिती केली. पण कोल्हापूर जिल्ह्यात संबंधित अधिकाऱ्यांनी स्वार्थासाठी केवळ काही शेतीगटांशी सलोखा करून इतर शेतीगटांना मात्र वाऱ्यावर सोडल्याचे विदारक चित्र आहे. त्यामुळे मतलबी अधिकाऱ्यांमुळे ‘आत्मा’तील ‘आत्मा’च हरवला असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

‘आत्मा’ च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत, नवनवीन कृषीविषयक माहिती मिळावी, नवनवीन योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून गावागावात शेतकऱ्यांना एकत्र आणून ‘शेतीगट’ स्थापन करण्यात आले. जिल्ह्यात सुरवातीच्या काळात भरमसाठ शेतीगट तयार झाले खरे, पण पुढे ते शासनाला कायमस्वरूपी कार्यरत ठेवता आले नाहीत. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात फक्त हातावर मोजता येतील इतकेच गट सध्या कार्यरत आहेत. बाकीचे गट अस्तित्वहीन झालेत. त्याचे कारण म्हणजे शेती अधिकाऱ्यांची मानसिकता. शेतकरी गट तयार केले खरे, पण काही अधिकाऱ्यांनी फक्त ठरावीक गटांशी सलोखा करून इतर शेतीगटांना मात्र वाऱ्यावर सोडल्याचे अनेक शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यात जवळपास १३०० शेतीगटाची कागदोपत्री नोंदणी झाल्याची दिसते. पण सध्या यामधील फक्त हातावर मोजण्याएवढेच गट कार्यरत आहेत. अनेक वेळा शेतकऱ्यांनी बोलावूनही कृषी अधिकारी भेटायला येत नाहीत,  पण हेच कृषी अधिकारी मात्र न बोलावता अथवा कार्यभार नसतानासुद्धा काही गावात दररोज जात असल्याचे सांगण्यात येते.  या पाठीमागचे गौडबंगाल आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजून घ्यायला हवे.

जिल्ह्यात कृषी योजनेअंतर्गत वेगवेगळे छोटे-मोठे उद्योग उभे करण्यात आले. पण बऱ्याच शेतीगटांनी उद्योगासाठी कागदपत्रांची पूर्तता करूनही त्यांना योजना मंजूर झाल्या नाहीत. सर्व कागदपत्रे, लाखोंची मशिनरी उपलब्ध असतानाही अनेकवेळा मूल्यांकन करण्यासाठी संबंधित अधिकारी जातात. पण त्यांना मंजुरी दिली जात नाही. काही शेतीगटांनी कागदपत्रांची पूर्तता न करता,  त्यांचे मूल्यांकन न करता, कोणतेही कर्ज मंजूर न होता मात्र त्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा झाल्याचा अजब प्रकार घडला आहे.

या सर्व प्रकारामागे कोणते अधिकारी थेट आपली पोळी भाजत आहेत याची शहानिशा करण्याची वेळ आली आहे. अन्यथा, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठीच स्थापन करण्यात आलेल्या ‘आत्मा’ संस्थेचा मूळ उद्देश बाजूला राहील आणि अपवाद वगळता इतरांच्या नशिबी नेहमीप्रमाणे निराशाच येईल. संस्था फक्त कागदावरच शिल्लक राहण्याची भीती व्यक्त होत आहे.