आजरा (प्रतिनिधी) : आंबोली घाटात असलेल्या धबधब्यानजीक दरड कोसळलेल्या भागाजवळ एका ३० वर्षीय तरुणीने कोणाला काही समजण्याआधीच दरीत उडी घेतली आणि सर्वांची पळापळ सुरु झाली.  काही लोकांनी ही घटना पोलिसांना कळवली. रेस्क्यू टीमने शोध मोहिम सुरु करुन त्या तरुणीला सुखरूप बाहेर काढले.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आज (मंगळवार) सायंकाळी साडेचारच्या सुमारास कमल नावाची ३० वर्षीय तरुणी सावंतवाडीहून एसटीने आंबोली येथे आली. त्यानंतर रिक्षाने आंबोली धबधब्याकडे आली. तिने रिक्षाचालकाला आपण अहमदनगरहून आल्याचे सांगितले. पंजाबी ड्रेस परिधान केलेली ही तरुणी रिक्षातून उतरल्यावर चपला काढत घाट रस्त्याच्या कठड्यावर गेली आणि कांही कुणाला कळण्याआधीच तिने दरीत उडी घेतली. त्यामुळे उपस्थित लोकांची पळापळ सुरु झाली. तेथील नागरीकांनी आंबोली पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शोध मोहीम सुरू केली.

दाट धुके आणि संततधार पाऊसामुळे शोध मोहीमेत अडचण येत होती. अखेर ती तरुणी एका कड्यावर सापडली. एवढ्या उंचावरुन उडी घेतल्यानंतर ती तरुणी जिवंत होती. तिच्या पाठीला किरकोळ दुखापत झाली आहे. तिने कोणत्या कारणासाठी उडी घेतली याचा शोध आंबोली पोलीस घेत आहेत.