कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि जिल्हयातील शिवसेनेतील गटबाजीला थारा मिळणार नाही. एकसंघपणे कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम करून पुन्हा शिवसेनेला गतवैभव मिळवून द्यायचे आहे. येत्या काही दिवसांत आघाडीचे सरकार म्हणून ग्रामविकास मंत्री हसन मुंश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन विविध शासकीय समित्यांमधील निवडीसंबंधी चर्चा करणार आहे.

सर्वच समित्यांमध्ये राज्यात ज्याप्रमाणे सत्तेचे सूत्र ठरले आहे, त्याप्रमाणे शिवसैनिकांना पदे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आमचंही आता ठरलयं, काय काय ठरलंय ते पुढील काही दिवसांत समोर येईल, असे सूचक विधान शिवसेनेचे नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केले.

ते म्हणाले, शिवसेनेचा संपर्क मंत्री म्हणून जिल्ह्यात बारकाईने लक्ष घालणार आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. कोणत्याही शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही. जिल्हयात एकेकाळी ६ आमदार होते. आता केवळ एकच आमदार आहे. त्यामुळे पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पक्षाची भूमिका काय असेल, यासंबंधी आमचंही ठरलयं, ते आताच आम्ही उघड करणार नाही. कालांतरांने काय ठरवलयं ते कळत जाईल. शिवाजी विद्यापीठातील प्रलंबित चौकशींना गती दिली जात आहे. विद्यापीठ स्तरावरील कामकाजाला गती देण्यासाठी महिन्यांतील एक दिवस मंत्रालयच विद्यापीठात आणण्याचे नियोजन केले आहे. सीमा भागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांची सोय होण्यासाठी चंदगडमध्ये नव्याने महाविद्यालय सुरू करून त्यामध्ये विविध कोर्स सुरू होतील. त्यासाठी सध्या भाड्याची इमारत शोधण्याचे काम केले जात आहे. लवकरच कायमस्वरूपी जागा निश्चित होईल.