मुंबई (प्रतिनिधी) : राजधानी दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दिवाळीनंतर मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आरोग्य विभागाने मुंबईसह राज्यात दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या दहा दिवसांत दिल्लीत ६० हजार कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. दिल्लीबरोबरच मुंबईसह महाराष्ट्रातही रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार दिल्ली-मुंबई हवाई व रेल्वे सेवा बंद करण्याच्या विचारात आहे. याबाबतचा आदेश महाराष्ट्र सरकारकडून लवकरच काढण्यात येईल, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. २८ ऑक्टोबरपासून दिल्लीत रुग्णसंख्येत वाढ होत असून एकाच दिवसाला ५ हजार रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर ११ नोव्हेंबरपर्यंत २४ तासात आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येने ८ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.