राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अधिक पण…: आरोग्यमंत्री

0
117

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अधिक असून मृत्यूदर कमी आहे. ट्रॅकिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या तीन गोष्टींवर भर देण्यास केंद्रीय पथकाने सांगितले आहे. त्या पध्दतीने महाराष्ट्र कोरोनाशी दोन हात करत आहे. या परिस्थितीला घाबरण्याची गरज नसून काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगून जनतेला खबरदारीचा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ट्रॅकिंग आपल्याला एकास २० किंवा एकास ३० पर्यंत घेऊन जाण्याची गरज असल्याची भूमिका आम्ही मांडल्याचे टोपे यांनी सांगितले. होम क्वारंटाइन असणाऱ्या व्यक्तींची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांपैकी एकूण ५ टक्के रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. अतिदक्षता विभागामध्ये असणारे रुग्ण ३.८ टक्के इतके आहेत. तर मागील आठ दिवसांमध्ये मृत्यूदर अडीच वरुन ०.४ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, असे टोपे यांनी सांगितले.

लो रिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसंदर्भातील अडचण मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीमध्ये पंतप्रधानांसमोर मांडली. अशापद्धतीने ट्रेसिंग करणे अवघड असले तरी यामध्ये जाणीवपूर्वक पद्धतीने राज्य सरकार लक्ष घालणार असल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले.