कागल (प्रतिनिधी) : गेल्या ३० ३५ वर्षांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीमध्ये हजारो बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळवून दिला. फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणांमधून हजारो तरुण-तरुणींना नोकऱ्या मिळाल्या. याचे आत्मिक समाधान मोठे आहे, असे प्रतिपादन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले.
कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्या पोलीस भरती प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुंबई पोलीस दलामध्ये भरती झालेल्या ६७ युवक-युवतींच्या सत्कार व शुभेच्छा कार्यक्रमात आमदार मुश्रीफ बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, गेल्या ३० वर्षांत हजारो कुटुंबांना हक्काची भाकरी मिळवून देऊ शकलो, याचा आनंद फार मोठा आहे. केडीसीसी बँक, केडर, शिक्षण खाते, दूग्धविकास खाते- महानंद, राज्यातील पोलीस भरती आणि कागलच्या पंचतारांकित एमआयडीसीमध्ये हजारो बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यात यश मिळाले.
मुंबई पोलीस दलात भरती झालेला निलजी, ता. गडहिंग्लज येथील अमर नारायण परीट म्हणाला, आमदार हसन मुश्रीफ हेच एक वटवृक्ष आहेत. वडाच्या झाडाप्रमाणेच जनतेवर त्यांची सावली आहे. आमच्यासमवेत आमच्या आई-वडिलांचाही सत्कार झाला. या सत्कारापेक्षा अन्य कोणताही मोठा सत्कार नाही.
गोरगरिबांच्या बाजूने उभे राहा
मुश्रीफ म्हणाले, पोलीस दलात सेवा बजावताना प्रामाणिकपणाने व निष्ठेने काम करा. आई -वडील व सासू-सासर्यांची सेवा करा. न्याय व अन्यायाच्या लढाईत सदैव गोरगरिबांच्या बाजूने उभे राहा.
प्रास्ताविकात फाऊंडेशनचे अध्यक्ष व गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ म्हणाले, गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून फाऊंडेशन विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर आहे. विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणातून फाऊंडेशनच्या वतीने आतापर्यंत नोकरीमध्ये नियुक्ती झालेल्यांची संख्या दोन हजारांहून अधिक आहे.
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने म्हणाले, आमदार मुश्रीफ यांनी कायमच बेरोजगारी हटवून रोजगार उभे करण्याला व नोकऱ्या लावण्याला प्राधान्य दिले. हाच खऱ्या अर्थाने शाश्वत विकास आहे. कागल केंद्राचे प्रशिक्षक आप्पासाहेब पाटील व सखाराम राजुगडे, गडहिंग्लज केंद्राचे प्रशिक्षक योगेश पाटील व बिरेंदर अडसुळे यांचेही सत्कार करण्यात आले.
‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह पाटील, शशिकांत खोत, शामराव पाटील-यमगेकर, दिनकर कोतेकर, कृष्णात पाटील, जीवनराव शिंदे, सूर्यकांत पाटील, धनाजी तोरस्कर, डी. एम. चौगुले, जगदीश पाटील, रमेश तोडकर, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील, रंगराव पाटील, अशोकराव नवाळे, ज्योती मुसळे, नारायण पाटील, दत्ता पाटील-केनवडेकर, संजय चितारी, ॲड. संग्राम गुरव आदी उपस्थित होते.