कार्यकर्त्यांच्या हट्टामुळे ‘गोकुळ’मध्ये शाहूवाडीच्या ‘आबां’ची भूमिका संदिग्ध…

0
5252

कोल्हापूर (श्रीकांत पाटील) : माजी आमदार सत्यजीत पाटील-सरुडकर यांच्या गटातील शिवसेनेच्या नाराज पदाधिकाऱ्यांमुळे गोकुळच्या निवडणुकीत वेगळा निर्णय होऊ शकतो. कारण, पुढील दोन दिवसात कार्यकर्त्यांशी बोलूनच आपला अंतिम निर्णय घेऊ, अशी भूमिका सरूडकर यांनी ‘लाईव्ह मराठी’शी बोलताना स्पष्ट केली आहे. त्यामुळे सरुडकर ऐन वेळी भूमिका बदलतात की काय, अशी शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

‘गोकुळ’च्या निवडणुकीत महाविकास आघाडी होणार म्हणून शिवसेनेचे माजी आमदार सत्यजीत पाटील-सरुडकर यांनी सत्ताधारी गटाला सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ दिली. पण, त्यांचे कट्टर विरोधक आणि जनसुराज्यचे आमदार विनय कोरे हेही महाविकास आघाडीत आल्यामुळे त्यांची चांगलीच गोची झाली. ज्या दिवशी ही आघाडी जाहीर झाली त्याच दिवशी दोन्ही विरोधी नेत्यांनी अगदी एकत्र यायला नको म्हणून वेळेतही मागेपुढे केले होते.

कोरे यांच्या समावेशामुळे स्थानिक राजकारणात अडचणी येऊ शकतात अशी भूमिका शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. त्यांनी सरुडकरांच्या या भूमिकेवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. वास्तविक गोकुळमध्ये पक्षीय राजकारणापेक्षा गटा-तटाच्या राजकारणाला फार महत्त्व आहे. हाच मुद्दा पुन्हा एकदा या निमित्ताने अधोरेखीत झाला आहे. कोरे यांचा समावेश शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अजिबात रुचलेला नाही. याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनीही पत्रक काढून कार्यकर्त्यांना आवाहन करत समजूत घालण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.

आघाडी जाहीर झाल्यानंतर सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर सरुडकर हे प्रत्येक कार्यकर्त्याला संपर्क साधून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, अजून त्यामध्ये त्यांना म्हणावे तसे यश प्राप्त होत नाहीय. दरम्यान, आज (गुरुवार) ‘लाईव्ह मराठी’ने त्यांची याबाबतची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी ‘कार्यकर्त्यांच्या अंतिम निर्णयानंतरच येत्या दोन दिवसात भूमिका जाहीर करू’, असे स्पष्टीकरण दिले आहे.

सरूडकर हे महाविकास आघाडीमुळेच विरोधकांना मिळाले होते. पण आता मात्र ते कदाचित आपली भूमिका बदलू शकतात अशी शक्यता राजकीय वर्तुळातून आणि त्यांच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. यामुळे गोकुळच्या निवडणुकीत अजून बरेच रंग बाकी आहेत, हेच अधोरेखीत होत आहे.