शेतकरी आंदोलनाचे पडसाद बाजार समितीत

माथाडी कामगारांनी पुकारले काम बंद आंदोलन

0
142

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील अनेक दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी धोरणांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये देखील उमटत आहेत. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बाजार समितीतील माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. यामुळे बाजार समितीतील व्यवहारावर त्याचा परिणाम झाला. कांदा उलाढाल व्यवहार बंद राहिली. त्यामुळे दिवसभर बाजार समितीच्या आवारात वर्दळ कमी राहिली.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करतानाच आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज (सोमवार) राज्यभरात माथाडी कामगार संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले. नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली साडेतीनशे माथाडी कामगारांनी काम बंदमध्ये सहभाग नोंदवला असल्याने आर्थिक उलाढालीवर दिसला.

बंदमुळे बाजार समितीत नेहमीची घाई दिसली नाही. व्यापारी, अडते आणि किरकोळ विक्रेत्यांची गर्दी तेवढी थोड्या प्रमाणात दिसून आली. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासहित माथाडी कामगार संघटनेनेदेखील आपल्या काही मागण्या केल्या. माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून करोनामुळे मृत झालेल्या कामगारांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, माथाडी कामगारांना कामावर येण्या-जाण्यासाठी रेल्वे तिकीट देणे आणि माथाडी कामगारांच्या कामात शिरकाव केलेल्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालावी या प्रमुख संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.