मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आला :  उदयनराजेंच टीकास्त्र

0
65

सातारा (प्रतिनिधी) : ‘मराठा समाजाचं आरक्षण हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलं आहे, यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेतेच कारणीभूत आहेत. तेच नेते आता सत्तेत आहेत. अजून किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अंत पाहणार आहात, असा सवाल राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

उदयनराजे म्हणाले, ‘मी माझ्यावतीनं नाही तर आपल्या पिढीच्यावतीनं आपल्या आगोदरच्या पिढीतील सर्व राजकीय नेत्यांना प्रश्न विचारायचा आहे की, मराठा समाजाचा प्रश्न तुम्ही प्रलंबित का ठेवला? मला विचाराल तर फक्त राजकारणासाठी आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आला. यावर आजवर कुणी खुलासा केलेला नाही, आधीच्या पिढीतील लोकांना आपण मतदान केलं, त्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्याचा सर्वांना अधिकार आहे.’

‘जोपर्यंत आपण मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अंत बघणार आहात. तुम्ही हा प्रश्न सोडवला नाहीत पण त्याचं उत्तर दिलं पाहिजे. उद्या आपली पिढी आपल्याला जाब विचारेल तेव्हा कुठल्या तोंडान त्यांना उत्तर द्याल, शरमेनं मान खाली घालावी लागेल. हा प्रश्न त्यांनीच मार्गी लावला पाहिजे कारण अजूनही तेच सत्तेत आहेत,’ अशा शब्दांत उदयनराजेंनी सत्तेतील मराठा नेत्यांनाही सवाल केला आहे.