कागल (प्रतिनिधी) : मतदार संघातील शेवटच्या सर्वसामान्य गोरगरीब माणसाला कोरोना प्रतिबंधक लस मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा विश्‍वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. ज्यांची ऐपत आहे त्यांना ही लस बाजारात उपलब्ध झाली पाहिजे आणि गोरगरिबांना मोफत मिळाली पाहिजे, अशी मागणीही मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी केली.

कागलमध्ये ग्रामीण रुग्णालयात कोरना प्रतिबंधक लसीचा समारंभपूर्वक वितरण शुभारंभ झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री मुश्रीफ उपस्थित होते. यावेळी ना. मुश्रीफ यांनी ही लस रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुनिता पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.

ना. मुश्रीफ म्हणाले की, संपूर्ण जग वर्षभर शोधात होते, त्याचे उत्तर या लसीच्या रूपाने सापडले आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला आणि अदर पूनावाला यांनी ही लस जानेवारीत उपलब्ध होईल, असा शब्द दिला होता. त्यांनी तो शब्द खरा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे माझी मागणी आहे की ज्यांची ऐपत आहे त्यांना बाजारात ही लस उपलब्ध करून द्या. तसेच गोरगरिबांना ही लस मोफत मिळालीच पाहिजे, अशी मागणीही ना. मुश्रीफ यांनी केली.

केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने म्हणाले, कोरोना विरुद्धच्या लढाईत कोरोना योध्द्याबरोबरच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ नेहमीच अग्रभागी राहिले. या लसीची निर्मिती ही एक क्रांतीच असल्याचे प्रतिपादन केले.

जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे म्हणाले, पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्याद्वारा ही एक दर्जेदार व गुणवत्तापूर्वक लस निर्माण झाली आहे. या लसीबाबत पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले.

यावेळी प्रवीणसिंह पाटील, पं. स.च्या सभापती पुनम महाडिक-मगदूम, उपसभापती अंजना सुतार, जि.प. सदस्या शिवानी भोसले, प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, डॉ. अभिजित शिंदे, माजी सभापती राजश्री माने आदी  उपस्थित होते.