जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ‘टाईट…

0
131

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हयातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. परिणामी, ऐन थंडीत गावगाड्यातील राजकीय वातावरण ‘टाईट’ झाले आहे. मोठ्या गावांमध्ये प्रमुख राजकीय नेत्यांनीही लक्ष घातले आहे.

कोरोनामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. पण आता धोका कमी झाल्याने ४३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तालुका पातळीवर अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया चालू आहे. आतापर्यंत संबंधित ग्रामपंचायतींमध्ये एकूण ५०७ उमेदवारांनी ५१७ अर्ज दाखल झाले आहेत. मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने सर्वच वार्डात चुरस निर्माण होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदारांनीही आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत लक्ष घातले आहे.

स्थानिक आघाड्यांसह प्रमुख राजकीय पक्षही निवडणूक रिंगणात असल्याने तुल्यबळ उमेदवारांना मागणी वाढली आहे. मतदानानंतर सरपंच पदाचे आरक्षण असल्याने कोणत्याही वॉर्डातील सदस्यास सरपंचपदाचा मान मिळू शकतो. त्यामुळे पॅनेलच निवडून आणण्याचे नियोजन केले जात आहे. गावागावांतील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.

गठ्ठा मतदान असलेले आणि मोठी भावकी असलेल्या कुटुंबात उमेदवारी देण्याकडे कल अधिक आहे. ऊस तोडणीचा हंगाम, थंडीचा गारठा अशा परिस्थितीमध्येही निवडणुकीचे वातावरण गरम झाले आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे -:
करवीर : ५४, शाहूवाडी : ४१, पन्हाळा : ४२, हातकणंगले : २१, शिरोळ : ३३, गगनबावडा : ८, राधानगरी : १९, कागल : ५३,  भुदरगड : ४५,  आजरा : २६, गडहिंग्लज : ५०,  चंदगड : ४१.