कोल्हापुरात २८ मार्चला ‘गगन दमामा बाज्यो’ नाटकाचा प्रयोग…

0
76

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काफिला थिएटर्स आणि महालक्ष्मी सिने सर्व्हिसेस यांच्यातर्फे ‘गगन दमामा बाज्यो’ हे दोन अंकी नाटक २८ मार्चला प्रथमच सादर होत आहे. शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारलेले हे नाटक आहे. हिंदीतील ख्यातनाम लेखक पियुष मिश्रा यांनी हे नाटक लिहिले आहे.

भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधून रविवार (दि.२८) मार्च रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी ११.३० वाजता या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. आजच्या युवकांपर्यंत सरदार भगतसिंग यांचे विचार पोहचावेत, त्यांना प्रेरणा मिळावी, या हेतूने हे पूर्णपणे सांगीतिक असलेले हे नाटक मराठी रंगभूमीवर प्रथमच सादर होत आहे. या नाटकात ३० कलाकारांनी सहभाग घेतला आहे.

तसेच या नाटकाचे लेखक – पियुष मिश्रा असून याचा अनुवाद – सतीश तांदळे यांनी केला आहे. तर या नाटकाचे दिग्दर्शन शंतनू पाटील यांनी केले असून  नेपथ्य-अभय मनचेकर, संगीत – ऋषिकेश देशमाने, प्रकाश योजना – सौरभ येडगे, वेशभूषा – अनुया नागवेकर, कोरिओग्राफी – प्रितेश रणनवरे, आकाश लिगाडे यांनी केले आहे.