रांची (वृत्तसंस्था) : एका युवकाला भाजप कार्यकर्त्यांकडून ‘जय श्री राम’च्या घोषणा द्यायल्या लावत मारहाण केली. त्यानंतर त्याला उठाबशा करायला लावत थुंकी चाटण्यास भाग पाडले.  हा धक्कादायक प्रकार झारखंडच्या धनबादमध्ये घडला आहे. विशेष म्हणजे ही घटना भाजप खासदार पीएन सिंह, आमदार राज सिन्हा आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

भाजपचे कार्यकर्ते धनबादमधील गांधी चौकात पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीबद्दल निषेध व्यक्त करत होते. त्यांच्या निषेधादरम्यान, एकाने झारखंड भाजपचे प्रमुख दीपक प्रकाश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी त्या मुस्लीम व्यक्तीला बेदम मारहाण केली. नंतर ती व्यक्ती तेथून पळून गेली. दरम्यान, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्वीट  करत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.