मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी जनजागृती आवश्यक असून त्यासाठी व्यापारी-उद्योजकांचा सहभाग महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्याच्या पर्यटन, पर्यावरण, माहिती व जनसंपर्क, उद्योग व राजशिष्टाचार खात्याच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज तसेच राजारामपुरी व्यापारी असोसिएशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या राज्यव्यापी जनजागरण अभियानाचा शुभारंभ आदिती तटकरे यांच्या हस्ते माहितीपत्रक आणि मास्क अनावरण करून करण्यात आला. चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी चेंबरच्या कार्याचा आढावा घेतला. राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष व चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी असोसिएशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून हा उपक्रम  राबवित असल्याचे सांगितले.

यावेळी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी, चेंबरच्या विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, वेदांशु पाटील, सागर नागरे आदी उपस्थित होते.