मुख्यमंत्र्यांनी सही केलेला आदेशच फिरवला : मंत्रालयातील धक्कादायक प्रकार  

0
272

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका महत्त्वाच्या फाईलमध्ये परस्पर फेरफार करत आदेशच फिरवल्याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी एका अभियंत्याच्या चौकशीच्या फाईलवर सही करत आदेश दिले होते. परंतु या फाईलमधील मजकूर मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर बदलण्यात आला. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर मंत्रालयात खळबळ उडाली आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधीक्षक अभियंत्याची चौकशीची फाईल आली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आदेश देत संबंधित फाईलवर सहीदेखील केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर या फाईलमधील मजकूर परस्पर बदलण्यात आला. स्वाक्षरीच्या वरच्या भागात लाल शाईने एक अतिरिक्त मजकूर लिहीत संबंधित अभियंत्याची चौकशी बंद करण्याचा  शेरा लिहिला होता. महत्त्वाच्या निर्णयात मुख्यमंत्र्यांची परवानगी गरजेची असते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीला महत्त्व असते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर शेरा बदलण्याचा धाडसी प्रकार मंत्रालयातच झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.