मुंबई (प्रतिनिधी) : नागपूरमध्ये येत्या १९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांचे वादग्रस्त वक्तव्य, राज्याबाहेर गेलेले उद्योग, शेतकऱ्यांच्या प्रश्नासह अनेक विषयांवर विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून तब्बल ८०० पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शेतकरी मोर्चाला अंतिम रूप देण्यात येणार असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनामध्ये शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी विरोधक तयारी करत आहेत का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. या अधिवेशन काळात नागपूरमध्ये शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे. सध्या शेतकऱ्यांच्या समस्या, शेतकऱ्यांना पीक विमा मिळताना येणाऱ्या अडचणी, बेरोजगारी, महागाई, राज्याबाहेर गेलेले उद्योग या प्रश्नावरून अधिवेशनामध्ये शिंदे -फडणवीस सरकारला विरोधक घेरण्याची शक्यता आहे.