पर्यायी जागेसाठी कळेतील वृद्धाचे पुन्हा उपोषण…

0
454

कळे (प्रतिनिधी) :  कसबा कळे-खेरीवडे ग्रा.पं. आणि जि.प. सदस्य सर्जेराव पाटील यांनी राहते घर पाडून  बेघर केल्याने कळेतील ज्ञानदेव शंकर डवरी हे न्यायासाठी ग्रामपंचायतीसमोर पुन्हा उपोषणाला बसले आहेत. डवरी हे नाथपंथी डवरी समाजातील भटक्या जातीतील असून ते मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात.

त्यांचे कळेतील बाजारवाडा परिसरातील प्राथमिक शाळेच्या आवारात १५०० स्क्वेअर फूटाचे  घर होते. याबाबत सोळा वर्षांच्या घरफाळ्याच्या पावत्या आणि अतिवृष्टीमुळे पडझड झालेला दोन ऑगस्ट २००५ चा तलाठ्यांच्या पंचनामा तसेच फोटोही आहेत. दरम्यान, जि.प. सदस्य सर्जेराव पाटील आणि ग्रामपंचायतीने दोन एप्रिल २०१७ रोजी त्यांचे हे घर पाडून डवरींना बेघर केले आहे. या परिसरातील इतरांच्या अतिक्रमणाकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करून आपले एकट्याचेच घर आकस बुद्धीने, दादागिरीने पाडले असल्याचा आरोप डवरी यांनी केला.

आपल्याला पर्यायी जागा द्यावी आणि केलेल्या कारवाईची कायदेशीर चौकशी व्हावी. यासाठी त्यांनी जुलै२०१९ मध्ये भर पावसात चार दिवसांचे उपोषण केले होते. दरम्यान, ही जागा महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असून ती देण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला नाही. त्यामुळे शासनाकडे जागेची मागणी केल्यास आपण ना हरकत दाखला देऊन सहकार्य करण्यास तयार असल्याचे लेखी म्हणणे तत्कालीन सरपंच सरिता सुभाष पाटील आणि ग्रामविकास अधिकारी राजेंद्र पाटील यांनी त्यावेळी दिले होते. त्यानंतर डवरी यांनी जिल्हा परिषद, तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि मंत्रालयाच्या विविध विभागांसमोर बारावेळा उपोषण केले. ग्रामपंचायतीने ठराव देऊन शासनाला प्रस्ताव पाठविला.

स्थानिक पातळीवरच्या तडजोडीत डवरी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर कळे विद्या मंदिर प्रशालेच्या मागील रिकाम्या जागेत लहान तात्पुरते शेड बांधले. आपल्या मागण्यांसाठी ग्रामपंचायतीसमोरचे त्यांचे हे दुसरे उपोषण सुरू आहे. गटविकास अधिकारी तुळशीदास शिंदे, कळे ग्रामपंचायतीचे प्रशासक पांडुरंग भोसले, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र पाटील यांनी भेट देऊन चर्चा केली.

तसेच घर पाडल्याचा आरोप अयोग्य असून सदरचे शेड पावसात नामशेष झाले होते. त्याने स्वतःहुन ते शेड काढून नेले असल्याचे आणि शाळेजवळ जागा न घेता उर्वरित कोणत्याही ग्रामपंचायत गायरान ठिकाणी जागा देण्यास आम्ही तयार आहोत असे स्पष्टीकरण जि.प.सदस्य सर्जेराव पाटील यांनी ‘लाईव्ह मराठी’शी बोलताना दिले आहे.